सन १९६५ साली संस्थेला कार्यालय मिळण्याचा सोन्याचा दिवस उजाडला. सात आठ वर्षे संथ परंतु सुरळीतपणे कार्य चालत राहिले. १९७४ पासून काहिशी मरगळ येवू लागली. ती सुमारे १९८७ पर्यंत दूर झाली नाही त्यात अनेक अडचणी होत्या त्यांचा इथे उहापोह करणे योग्य नाही.
अशाच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यात कै. सि.गं.देवरुखकर,कै.भार्गवशेठ शंकर सागवेकर, कै. शिवराम तानाजी देवरुखकर, कै. गोपाळ रा. सागवेकर, श्री. मो.ल.सागवेकर, श्री. दत्ताराम रामचंद्र देवरुखकर, श्री. सखाराम धोंडू देवरुखकर, श्री. सखाराम शंकर देवरुखकर, कै. शंकर जयराम वारणकर, कै. लक्ष्मण केशव सागवेकर, श्री. रामचंद्र महादेव देवरुखकर, श्री. रघुनाथ गंगाराम देवरुखकर, श्री. विष्णू गणपत देवरुखकर अशा कार्यकर्त्यांनी समाजाला कार्यालय मिळावे म्हणून महाप्रयत्न केले. त्यात कै. भार्गवशेठ सागवेकर यांची तळमळ अधिकच जाणवत होती.
संस्थेची ही अवस्था अनेकांच्या मनात सलत होती. संघटीतपणा लयाला जातो की काय अशी खंत वाटत होती. एका फर्लांगाच्या अंतरावर राहणा-या दोन समाजबंधुंची ओळख नाही. असे चित्र काही वेळा शुभाशुभ कार्याचेवेळी दिसून येऊ लागले आणि शेवटी कुर्ला ते डोंबिवली अशी मर्यादित सुवर्णकार संघटना सुरु करण्याचे विचार त्या विभागात राहात असलेल्या समाजप्रेमी बांधवांच्या मनात आले. त्यात प्रामुख्याने श्री. रामचंद्र दाजी सागवेकर, श्री मो. ल. सागवेकर, श्री. रामचंद्र दाजी वारणकर, श्री. जगन्नाथ महादेव देवरुखकर, श्री. राजाराम सखाराम देवरुखकर, श्री. राजाराम धोंडू हिरे, श्री. गजानन दाजी सागवेकर, श्री. आत्माराम रामचंद्र देवरुखकर, श्री. यशवंत शांताराम नगरकर, श्री. बाळकृष्ण नगरकर, श्री. बाळकृष्ण सुंदर सागवेकर (ठाणे),श्री मोहन महादेव सागवेकर(डोंबिवली), श्री. जयवंत रा. सागवेकर (विक्रोळी), श्री. कृष्णाकांत देवरुखकर, श्री. रामचंद्र पालकर (विक्रोळी), श्री. विठ्ठल बाबूशेट पालकर (मुंब्रा), श्री. दत्ताञय रामचंद्र नगरकर (मुलूंड), व श्री. कृष्णा सागवेकर(कुर्ला) आदिंचा पुढाकार होता. कामकाज चालू झाल्यानंतर चिञ बदलत असल्याने अनुभवास येऊ लागले. प्रेत याञेस व इतर शुभ कार्यास समाज बांधवांची उपस्थिती वाढू लागल्याचे प्रकर्षाने जाणवले. वरील मंडळींनी विभागवार सभा घेऊन सामाजिक एकोपा घडवून आणण्याचे फार मोलाचे काम केले आहे. पहिली विभागवार सभा श्री मो. ल. सागवेकर यांचे निवासस्थानी १९८६ साली घेण्यात आली. प्रत्येक विभागात महिना प्रत्येकी रु. ५/- वर्गणी घेऊन सभासद करण्यात आले. त्यांना अशीही कल्पना देण्यात आली होती की, जेव्हा आपली मूळ संस्था सुरु होईल तेव्हा तुमचे जमा असलेले पैसे तिकडे जमा करुन तुम्हाला आपल्या मुळ संस्थेचे सभासद करण्यात येईल. समाजबंधूंनी ते मान्य केले. इथूनच संस्थेचे पुनर्जीवन झाले, असे म्हणावे लागेल.
या विभागातील समाजबांधवांना आम्ही धन्यवाद देतो. विभागीय चिटणीस म्हणून श्री. रामचंद्र दाजी सागवेकर यांनी उत्तम कामगिरी केली आहे. मुंबईतल्या समाजबांधवांना व जुन्या सभासदांना मनापासून वाटत होते की, दादरची संस्था पूर्ववत चालू व्हावी अशा चर्चा अनेकवेळा ऐकावयास येत असे. दि. ९ जूलै १९८७ बहुसंख्य समाजबंधू उपस्थित होते त्यावेळी संस्थेविषयी विचारणा करण्यात आली. श्री. शंकर लक्ष्मण देवरुखकर यांनी संस्थेचे काम सुरु करण्याविषयीच्या प्रश्नाला वाचा फोडली. सर्व जुने कार्यकर्ते हजर होते. त्यांच्यात विचार विनिमय होऊन १९७४ साली निवडण्यात आलेले सरचिटणीस श्री. ज.म. देवरुखकर यांना जेव्हा कार्यकर्त्यांनी विचारणा केली की, तुम्ही जबाबदारी घेऊन हे काम पूर्ण कराल का? यावर सरचिटणीस म्हणून कसलेच अधिकार देण्यात आले नव्हते. तेव्हा गेल्या अनेक वर्षाचे संस्थेसंबंधीचे कागदपत्र व्यवस्थितपणे मिळाले तर आणि ज्यांनी हे काम थोडेबहूत हाताळले आहे. त्यांचे सहकार्य मिळाले तर मी ही जबाबदारी स्विकारतो असे. ज. म. देवरुखकर यांनी विश्वासपूर्वक सांगितले.
मध्यंतरीच्या काळात श्री. र. गन. देवरुखकर संस्थेचे कामकाज थोडेबहूत हाताळत होते. त्यांनी आश्वासन दिले की, मागील हिशोबासंबंधीचे सर्व कागदपत्रे व्यवस्थित करुन मी देऊ शकेन. त्यानंतर सरचिटणीस श्री. ज.म.देवरुखकर यांनी आपल्या पद्धतीने कामकाजास सुरुवात केली. जेष्ठ व जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन विचार विनिमय केला व इतक्या वर्षांचे राहिलेले हिशेबाचे काम करण्यास संस्थेच्या कार्यकारीणीत असलेले श्री. रामचंद्र दाजी वारणकर यांचा समाजाला चांगला उपयोग होईल असे सुचविले व त्यानुसार त्यांना कै. भार्गवशेठ सागवेकर , श्री. मो.ल.सागवेकर व चिटणीस यांचेकडून विनंतीपत्र मान्य करुन काम स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर श्री. रा.दा.वारणकर यांनी श्री. ज.म.देवरुखकर यांच्या सहकार्याने सुमारे १४ महिने मेहनत करुन हिशोबाची सर्व कामे पूर्ण केली. या कामी झालेला सर्व प्रवास खर्च पदरचा केलेला आहे. हिशोब व कार्यालयात येणा-या अडचणीत मानसिक संतुलन नीट राहण्यासाठी चिटणीसांना कै.भार्गवशेठ शं. शागवेकर , श्री. मो.ल.सागवेकर व श्री. रामचंद्र दा. सागवेकर यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे.४ वर्षांचा हिशोब तयार करुन पहिली. सर्वसाधारण सभा दि. ३ डिसेंबर,१९८८ रोजी श्री. सि. गं. देवरुखकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेचे कामकाज श्री. मो.ल.सागवेकर यांनी पार पाडले.
नवीन कार्यकारीणीत श्री. भार्गव शंकर सागवेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे कामकाज सुरळीत व नव्या जोमाने सुरु झाले. कार्यकर्त्यांची नजर आता मुंबईच्या बाहेर महारष्ट्रातल्या विखुरलेल्या समाज बांधवांकडे लागली होती. सर्व ठिकाणी सुवर्णकार धंदयासाठी बँकांकडुन अर्थसहाय्य मिळत नव्हते. आपल्या बांधवांना ही सोय मिळावी व भाडंवल जमा करणे त्यांना सोपे व्हावे या हेतूने कार्यकारी मंडळ विचार करु लागले. त्यातून समाजाची पतपेढी असावी, अशी कल्पना श्री. राजाराम सखाराम देवरुखकर यांच्या मनात आली. त्यांनी ती संस्थेपुढे मांडली. संस्थेला पक्का विचार ठरवल्यावर कार्यकारी मंडळाने खडतर प्रयत्न करुन सभासद मिळवणे व पतपेढीसाठी रजिस्ट्रेशन मिळवणे यासाठी आपली शक्ती पणाला लावली. या प्रयत्नातून आपली स्वतःची विश्वकर्मा सुवर्णकार सह. पतपेढी अध्यक्षस्थानी श्री. मो. ल. सागवेकर व चिटणीसपदी श्री. रा.दा. वारणकर यांची नियुक्ती करण्यात आली. गेली 10 वर्षे पतपेढीचे कामकाज सुरळीतपणे सुरु आहे.सतत “अ “ वर्ग मिळत आहे. यात चिटणीस श्री. रा. दा. वारणकर यांचे योगदान मोलाचे आहे. पतपेढीसाठी करण्यात आले आहे. समाजाच्या शिबिरात झालेल्या प्रगतिविषयक चर्चेचा पहिला टप्पा म्हणावा लागेल.
सहकार्याने झपाटलेले कार्यकारी मंडळ सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊनच काम करत होते. समाजातील चालीरीती , ठिकठिकाणी वेगवेगळया होताना दिसत होत्या. त्यात एकसूत्रीपणा यावा. सर्व ठिकाणी कार्यक्रमातील विधी एकाचप्रकारे पार पाडावेत, तसेच् अनेक भेडसावणारे प्रश्न सुटावेत. यासाठी फक्त मुंबई संस्था काही करु शकणार नाही. याकामी संपूर्ण महाराष्ट्रातील समाजबांधव एकत्र यायला हवेत, असे मत अध्यक्ष कै. भा. शं. सागवेकर यांनी बोलून दाखविले. त्यावर महाराष्ट्रव्यापी सुवर्णकार यांनी बोलून दाखविले. त्यावर महाराष्ट्रव्यापी सुवर्णकार परिषद संस्थेने भरवावी. या विषयावर कार्यकारीणीचे एकमत झाले. त्याप्रमाणे चिटणीसांनी कामाची आखणी केली. सर्व मुंबई विभागावर सभा झाल्या. समाजबंधूंना प्रेरित करण्यासाठी उपाध्यक्ष श्री. मो.ल.सागवेकर आणि समाजकार्यकर्ते जिवाचे रान करत होते. परिषदेसाठी निधी गोळा करणे हे अतिशय महत्वाचे काम होते. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संस्थांशी चर्चा करुन त्या सर्वांचे सहकार्य संस्थेला मिळावे अशा प्रकारे प्रयत्न करण्यात आले. सर्व संस्था मुंबई संस्थेची सहमत झाल्या व जास्तीत जास्त आर्थिक साहाय्य आम्ही करु अशी आश्वासने मिळाली. वि.सु.स.मुंबई संस्थेचा प्रत्येक कार्यकर्ता निधी जमा करण्यासाठी वणवण फिरत होता. मुंबईतून अधिकाधिक निधी जमा करणे गरजेचे आहे. हे तो जाणत होता आणि प्रयत्नांची पराकाष्टा करत होता.संस्थेचे सल्लागार श्री. यशवंत शंकर सागवेकर यांनीही परिषदेला भरघोस निधी मिळवून दिला.
प्रथम परिषद भांडुप (मुंबई) येथील सहयाद्री विदया मंदिराच्या भव्य पटांगणात भरविण्याचे ठरविण्यात आले होते. भांडुप परिसरात राहणारे संस्थेचे पाच कार्यकर्ते अविरत झटत हेते. निधी जमा करणे, परिषदेसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करणे, कायदेशीर बाबी सांभाळणे. परिषदेस येणा-या समाज बांधवांची योग्य प्रकारे सोय व्हावी म्हणून प्रयत्न करणे, कायदेशीर बाबी सांभाळणे परिषदेस येणा-या समाजबांधवांची योग्य प्रकारे सोय व्हावी म्हणून प्रयत्न करणे. या कामात सर्वजण मग्न झाले होते. परिषदेनंतर श्री. जगन्नाथ म. देवरुखकर, श्री. रामचंद्र दा. वारणकर , श्री. रामचंद्र दा. सागवेकर , श्री. राजाराम स. देवरुखकर व श्री. आत्माराम रा. देवरुखकर या पाच कार्यकर्त्यांचा भांडुपचे पाच पांडव असा नामोल्लेख करण्यात येऊ लागला.दि. १२ व १३ नोव्हेंबर,१९९४ हे परिषदेचे दोन दिवस भांडुप परिसरात विशेष स्वरुपाचे ठरले होते आणि पंचाल सुवर्णकारांच्या आयुष्यातील एकतेच्या दृष्टीने सुवर्णमय दिवस ठरले कारण याच दोन दिवसात अल्प संख्येने असणारे सुवर्णकार बांधव व महाराष्ट्रातील विविध पंचाल सुवर्णकार संघटना एकरुप होऊन गेल्या. चर्चा सत्रात समाजाला भेडसावणा-या अनेक समस्यांची उकल करण्यात आली. सर्वांसमोर अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. जेणेकरुन समाजात एकसूत्रीपणा येऊ शकेल. परिषदेतील निर्णयांचा उपयोग समाजाला ख-या स्वरुपात होत असल्याचे अनुभवास आले.
त्यानंतर संस्थेच्या प्रसार माध्यमांची उणीव प्रकर्षाने जाणवू लागली. समाज प्रबोधनासाठी प्रसार माध्यम अत्यंत आवश्यक आहे. हे वेळोवेळी जाणवू लागले. त्यातच श्री. सुनील दत्ताराम देवरुखकर , श्री. जयवंत राजाराम देवरुखकर व श्री. शांताराम शंकर सागवेकर यांचे डोक्यात संस्थेचे मुखपत्र असावे हा विचार घर करुन बसला होता. ते सतत संस्थेला यासंबंधी विचारणा करत होते. अनेक दिवसांच्या विचारानंतर स्वतःचे मुखपत्र असावे यावर ठाम निर्णय घेण्यात आला. व विश्वकर्मा पंचाल हा समाजाचा समाजासाठी चालविले जाणारे पहिले मासिक १९ फेब्रुवारी १९९५ रोजी सुरु करण्यात आला. यासाठी श्री. सुनील दत्ताराम देवरुखकर यांनी अंकासंबंधी सर्व जबाबदारी स्विकारली. विश्वकर्मा पंचालसाठी संपादक श्री. शांताराम शंकर सागवेकर अशी नियुक्ती करण्यात आली. संस्थेचा प्रसाराचा मार्ग सुखकर होऊ लागला. संपादक व सहसंपादक यांचे नेतृत्वाखाली संपादक मंडळ कार्यरत आहे. काम सुरळीत चालू आहे. दिवाळी अंकांना पुरस्कार मिळत आहे. संस्थेचे नाव उज्वल होत आहे.
एका परिषदेनंतर समाजातील जिवंतपणा व वाढलेले सामाजिक बळ याचा अनुभव येऊ लागला आणि संस्थेच्या मनात आणखी एखादी परिषद ग्रामीण भागात व्हावी असे येऊ लागले. जिल्हा पातळीवरुन अशा सुचनाही येत होत्या. पहिल्या परिषदप्रमाणेच हालचाल करुन यंत्रणा राबविण्यात आल्या.
या व्दितीय परिषदेसाठी विचारविनीमय करण्यासाठी पहिली सभा चिपळून येथे श्री. हरुशेठ पालकर यांचे निवासस्थानी घेण्यात आली. दिनांक ८ व ९ नोव्हेंबर,१९९७ रोजी चिपळूण येथे व्दितीय परिषद घ्यावी असे ठरविण्यात आले. कामाला सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रातल्या संस्थानी कार्यभार उचलण्याचे आश्वासन दिले. वि.सु. स. मुंबईने परिषदेचा अर्धा आर्थिक भार सोसण्याचे सांगितले व सर्वांना आपल्यापरिने चोख कामगिरी बजावली.प्रथम परिषदेत राहून गेलेले विषय प्रामुख्याने हाताळले गेले. उपस्थित समाजबंधूंना भेडसावणा-या प्रश्नांची उकल करण्यात आली. अनेक विषयांवर चर्चा झाल्या. कोकणात समाजाची एकजूट दिसून आली.या परिषदेसाठी चिपळून येथील श्री.बप्पाशेठ पालकर,श्री. हरुशेठ पालकर ,श्री. दत्तराम रा. देवरुखकर (आनबडस), श्री. मुरलीधर वि. बोरसूतकर गुरुजी, श्री. सदानंद गंगाराम वारणकर व वि.सु.स. मुंबईच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन परिषद यशस्वी केली. वि.सु.स. मुंबईचे अध्यक्ष कै. भा. शं. सागवेकर यांचे सतत मार्गदर्शन परिषदेच्या कामी यशदायी ठरले. परिषदेचे अध्यक्षपदी श्री. मो. ल. सागवेकर व चिटणीसपदी मागील परिषदेचे चिटणीस श्री. ज. म. देवरुखकर यांनी काम पाहिले.
त्यानंतर संस्थेला जाणवू लागले की भविष्यातील कार्यभार सांभाळण्यासाठी व सामाजिक अडीअडचणी समजावून घेण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन समाजाला कार्यकर्ते मिळतील व संस्थेलाही त्यांची चांगली मदत होऊ शकेल. यासंबंधी समाजातील तरुण तरुणींना एकत्र करुन त्यांना मार्गदर्शन करुन त्यांची एकजूट करण्यासाठी श्री.यशवंत शंकर सागवेकर व संपादक श्री. सुनील दत्ताराम देवरुखकर यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या परिश्रमाने ’युवामंच “ ही युवक संघटना स्थापन झाली. संस्थेने श्री. यशवंत शंकर सागवेकर यांना युवामंचचे संचालक म्हणून नियुक्त केले. ’युवामंच“ संस्थेप्रमाणेच सतत कार्यरत आहे.
सर्व समाजात महिला संघटना काम करताना दिसतात. तशी आमच्या संस्थेचीही महिला आघाडी किवां महिला संघटना असावी असे विचार अनेक वर्षे संस्थेच्या मनात होते व त्यानुसार प्रयत्न करुन सामाजिक क्षेत्रात वावरणा-या समाजातील महिलांशी विचार विनीमय करण्यात आला व श्री. मो. ल. सागवेकर यांच्या पुढाकारानी महिला संघटना स्थापन झाली. महिला संघटनेच्या अध्यक्षपदी सौ. लक्ष्मी अनंत देवरुखकर यांची नियुक्ती झाली. आज महिला आपल्यापरिने कार्यक्रम राबवून आपली एकजूट टिकवून आहेत. सामाजिक संस्थांची खरी भिस्त असते ती खरं तर कार्यकारी मंडळावरच , वि.सु.स. मुंबईच्या कार्यकारीणीतील कार्यकर्ते निस्वार्थी , मनमिळावू , श्रमांची पर्वा न करणारे व संस्थेवर मनापासून श्रद्धा ठेवणारे असल्यामुळेच हा एवढा मोठा वटवृक्ष डौलाने उभा आहे. त्यांच्याच खांदयावर हा अवजड डोलारा ठेवून लेखन प्रपंच थांबवतो.